उद्दिष्ट: तंत्रज्ञानावर आधारीत समाज-विभाजनाच्या

इन्डिक्ट्रान्स तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण झालेली दरी भरुन काढणे हे चमुचे ध्येय आहे. भारताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात साधलेल्या प्रगतीचा लाभ इंग्रजीची भिती बाळगणाऱ्या ९८% लोकांपर्यंत पोहोचविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण. म्हणूनच आम्हाला जागतीक दर्जाची शैक्षणिक साधने सर्वदूर पसरलेल्या शाळांपर्यंत पोहोचवायची आहेत. यासाठी अलीकडेच संगणकांचा वापर करु लागलेल्या प्रादेशिक शाळाना प्राधान्य द्यायला हवे असे आम्हाला वाटते. अशा शाळाना सॉफ्टवेअर साधने, मदतपुस्तिका आणि अगदी इतर आवश्यक मदतही देण्याचा आमचा विचार आहे. याचाच एक भाग म्हणून आम्ही शैक्षणिक साधनांचा संच असलेली Freeduc सीडी उपलब्ध करुन देत आहोत (सौजन्य : http://www.ofset.org. ही सीडी युनेस्कोद्वारा पुरस्कृत होत आहे. आता आम्ही ही साधने ( जि "जिएनयु/लायनक्ससह मुक्त शाळा" या नावाने ओळखली जातात ) भारतीय भाषेमध्ये उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात आहोत.

संगणकीय कार्यक्रमाच्या स्थानिकीकरणापासून सुरुवात करण्याचा आमचा विचार आहे. पण आमचे लक्ष्य एवढ्यापुरतेच मर्यादित नसून, इतरही काही क्षेत्रात, उदा. संगणक कार्यक्रम निर्मिती, स्थानिकीकरण आणि त्यासाठी आवश्यक मदत पुरविणे इ. संगणकीय साक्षरतेची कामे करण्याचे आम्ही ठरविले आहे.

या कार्यात विविध स्तरातील लोकांचा सक्रीय सहभाग असावा असे आम्हाला वाटते. अशा सहकार्यासाठी आवश्यक साधनसामुग्री या संकेतस्थळाच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस आहे. याचप्रमाणे आम्ही पत्राचाराद्वारे देखील अशा सहकार्यास प्रतिसाद देऊ. उपलब्ध आणि मर्यादित साधनांसह किमान खर्चात शिक्षणक्षेत्रात महत्वाचे बदल घडवून आणणे ही दिशा आहे.

हे सर्व संगणकीय तंत्रज्ञान, शिक्षणप्रसाराचे एक माध्यम म्हणून खेडीपाडी आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचवायचे आहे. याकामी आम्हाला हार्डवेअर उत्पादक, समाजसेवक, भाषाप्रेमी, हौशी/घरगुती संगणक कार्यक्रम विकासक अशा सर्वांची मदत अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे भारताने शासकीय संस्थांनी आमच्या कार्याची दखल घेऊन सहकार्य करावे अशी अपेक्षा अहे.

खऱ्याखुऱ्या सामाजिक विकासासाठी तंत्रज्ञानाचा विनियोग व्हायला हवा आणि तंत्रज्ञानाच्या आधाराने होणारे समाजाचे विभाजन टाळायला हवे अशा आशयाच्या जिएनयुच्या तत्वज्ञानाचा आधार असलेल्या या प्रकल्पात आपणही सहभागी व्हावे असे आम्हाला वाटते.